निरा | प्रतिनिधी
आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो" या उदात्त भावनेतून दिवंगत विठ्ठलराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दगडे परिवाराकडून समाजोपयोगी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी दगडे परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले.
निरा नदीकाठी दशक्रिया विधीसाठी दूरदूरवरून – पंचवीस ते पन्नास किलोमीटर परिसरातील – अनेक लोक येतात. या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. उन्हाळा, वारा व पावसामुळे येणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागायचा. या पार्श्वभूमीवर दगडे परिवाराने "स्मृती भवन" उभारले. या इमारतीत बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, नदीकाठावर येणाऱ्या सर्वांना यातून सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. पुण्यस्मरणाच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे पुढील सत्र लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडले. येथे हरिभक्त पारायणकार ह.भ.प. अमोल महाराज सूळ यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचा दुसरा विषय सादर केला. कीर्तनात संतवाङ्मयाचे गोडवे गात नागरिकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले. दुपारी बारा वाजता भजन व कीर्तन संपल्यानंतर विठ्ठलराव दगडे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित महाप्रसादात मोठ्या संख्येने महिला-पुरुष सहभागी झाले.
या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी निरा, पिंपरे, निंबूत, शिवतक्रारवाडी तसेच परिसरातील गावांमधून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी दगडे पाटलांच्या आठवणी जागवून त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.विठ्ठलराव दगडे पाटील यांच्या स्मृतीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे. दगडे परिवाराने उभारलेले स्मृती भवन हे पुढील काळात शेकडो लोकांना लाभदायी ठरणार असून, पुण्यस्मरण दिन समाजकार्य व धर्मकार्याच्या एका सुंदर संगमाचे प्रतीक म्हणून कायम लक्षात राहील.


0 Comments